आड किल्ला,डुबेरकिल्ला व औंढाकिल्ला
घुम्मकड
रविवार 23जानेवारी 2021रोजी नेहमी प्रमाणे मी व ट्रेक पार्टनर अंशुमन ने जोरदार गार वारे व बोचऱ्या थंडीचा मारा झेलत सह्याद्रीच्या मायाजाला कडे केलेली कूच❤️
तर आजचा ठरलेला ट्रेक होता,आड वाटेवरचा आड किल्ला व खतरनाक असा औंढा किल्ला.
तर मग नेहमीच्या सिरस्त्या प्रमाणे सौ.ने पहाटे उठून बनवून दिलेला टिफिन व अंशुमन ने आदल्या रात्रीच उद्याच्या ट्रेकच्या दृष्टीने बैजवार काढून ठेवलेले सामान घेऊन नेहमीप्रमाणे दोघांच्या सॅक पॅक केल्या व गाडीला किक मारून देवळाली,भगूर-पांढुर्ली फाटा मार्गे घोटी-सिन्नर मार्ग गाठला.हरसुली गावापासून पुढे सोनारीमार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या आडवाडीकडे प्रस्थान केले.
सकाळी साधारण ८:४०वाजता वरच्या अडवाडीत पोहोचलो,व तिथुन पुढे आड किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो.
गाडी वरून उतरलो तर अंशुमनच्या भुवया व पापण्यासुद्धा मातकट-भुरकट दिसत होत्या.मला वाटले की कच्चा रस्ता असल्यामुळे रस्त्याच्या धुळीमुळे असे झाले असावे पण रात्री घरी आल्यावर टीव्ही वरील बातम्यांमध्ये कळले की पाकिस्तान(कराची) वरून आलेल्या धुळीच्या वावटळीमुळे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे😀
असो...🙏🏻
किल्ल्याच्या पायथ्याला दोन शाळकरी मुले भेटले अजय व गणेश.त्यांना गडावर जाण्याचा मार्ग विचारत विचारत परत एकदा दोघांच्या सॅकची उजळणी केली व लगेचच गडाकडे कूच केली कारण इकडे येत असतांना सोनारी गावात कळले की इथे बाजूलाच सोनारीचा किल्ला? आहे मग थोडी चर्चा केली तर तो आपला थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव असलेल्या डुबेरगावांचा डुबेरगड. मग काय आजच्या भटकंतीत त्याची सुद्धा गडभ्रमंती जोडल्या गेली.🙏🏻
आता घाई करणे क्रमप्राप्तच होते कारण आता आड,डुबेर व औंढा असा कसदार भटकंतीचा योग जुळून आला होता.
गडाचा पहिला टप्पा पार केला व आजूबाजूस पाहिले तर आजूबाजूचा परिसर संपूर्णतः धुक्यात गडप झालेला दिसत होता. जोरदार गार वारे व त्याला जोड म्हणून कडाक्याच्या थंडीने आम्हाला पहिली सलामी दिली😍 मोबाईल मधे weather forecast वर हवेचा वेग किती असावा हे चेक केले तर तो होता 18.3km/hr. व temp. होते 16c😳
पहिला टप्पा पार केल्यानंतर पुढील टप्पा हा डोंगर पोटाने सरळ पुढे जाऊन गड माथ्याकडे जातो.त्या मार्गे गेल्यानंतर आम्हाला एक टाके लागले नुकतेच ते टाके उकरलेले दिसत होते त्यामुळे त्यात तुडुंब भरलेले पाणी होते. टाक्याच्या थोडे पुढे गेले की एक कोरडा तलाव दिसतो त्या तलावावरून सरळ पुढे आल्यावर परत आपल्याला दोन टाके दिसतात त्याच्या अजून थोडे पुढे आलो की आपल्याला पाच-सहा टाक्यांचा समूह व टाक्यांचा वरच्या बाजूस एक भरभक्कम अशी दगडी शिवपिंड नजरेस पडते.तिथून अजून थोडे पुढे आल्यावर आपल्यास उजव्या बाजूने एक भगवा झेंडा फडकताना दिसतो त्याच्या पूर्व बाजूने पुढे गेले की खाली उतरण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या मार्ग लागतो. त्या पायऱ्या उतरून आपण उजव्या बाजूने चालत पुढे आलो की आपल्याला एक गुहा लागते. ह्या गुहेत गडदेवता अडूमातेचे मंदिर व काही शेंदूर लावलेले अज्ञात देव दिसतात.सोबतच गुहेच्या बाजूलाच एक टाके आहे. त्यात बऱ्यापैकी स्वच्छ पाणी आहे. गड देवतेचे दर्शन घेऊन आम्ही माघारी फिरलो व कातळपायऱ्या चढून वरती येऊन पश्चिम दिशेने पुढे चालण्यास सुरुवात केली.गडावर सध्या कंबरेच्यावर गवत माजलेले आहे त्यामुळे स्पष्टपणे अशी वाट नजरेस पडत नाही पण अंदाजा अंदाजाने आम्ही एक दोन घळीच्या तोंडापर्यंत जाऊन गडावरील नाशिक दरवाजा शोधण्याच्या प्रयत्न केला. शेवटी तिसऱ्या घळेच्या पुढे आल्यावर अंशुमनला नाशिक दरवाजा नजरेस पडला! दरवाजाच्या मार्गातील दगड,माती काढून प्रशस्त असा दरवाजा आता मोकळा केला गेला आहे. पायऱ्या सुद्धा एकदम रुंद व भक्कम स्थितीत आहेत.बाजूलाच एका टाक्याचे अर्धवट असे खोदकाम केलेले आहे.(काम चालू असावे)तिथून आम्ही आजूबाजूच्या परिसरावर नजर टाकून पाहिले तर फक्त आणि फक्त धुरकट दिसत होते म्हणजे आज फक्त गडभ्रमंतीच बाकी चौफेर परिसर पाहण्यास बंदीच होती थोडक्यात असे म्हणा ना(कराचीच्या कृपेने🤣)
आता आम्ही नाशिक दरवाजा बघून काही फोटो घेतले व परत पुढे चालत आल्यावर पाच टाक्यांचा समूह नजरेस पडला.तो पाहून आम्ही टाक्यांचा समोरच्या बाजूने आम्ही गडावरील सर्वोच्च ठिकाणी आलो तिथे एक समाधी व काही समाधीचे दगड विखरलेल्या अवस्थेत पडलेले दिसले.
गडपठार त्या मानाने भरपूर विस्तृत आहे व गडावर भरपूर टाके सुद्धा आहेत म्हणजे पूर्वी गडावर बऱ्यापैकी राबता असावा🙏🏻
सकाळच्या१०.२०वाजेच्या दरम्यान आमची गडभ्रमंती झाली होती. आज गडावर आमच्या दोघां व्यतिरिक्त कुणीही नव्हते.
आता आम्ही घाई करून लगेचच गड उतरण्यास सुरवात केली. खालच्या टप्प्यात एका कपारीवजा जागेवर बसून गूळ,खाऱ्या फुटाण्यांवर ताव मारून थोडे पाणी पिऊन अंशुमन व मी गडपायथ्याला आलो व गाडीला किक मारून डुबेर गडाकडे कूच केली🙏🏻
....डुबेर गावाच्या अलिकडूनच एक रस्ता खदाणीच्या मार्गे गडाकडे जातो त्या मार्गे आम्ही गड पायथ्याला पोहोचलो व नागेश्वर मंदिरासमोर आम्ही गाडी पार्क करून वेळ न दवडता गडावर चढाई सुरू केली. गडावर जाण्यासाठी संपूर्णतः पायऱ्या केलेल्या आहेत.पायऱ्या मार्ग संपल्यानंतर खालच्या बाजूस दोन मोठे टाके आहेत तिथून पुढे आलो की सप्तशृंगी मातेचे मंदिर लागते.मंदिराच्या थोडे पुढे जाऊन समोरील परिसर पाहून आम्ही परत मंदिराकडे आलो तिथून उजव्या बाजूस एक छोटेखानी मंदिर लागते त्यात दगडी पादुकांची शिळा आहे.तिथून पुढे आले की एक पिराचे ठिकाण लागते.तिथे थडगेवजा चौथऱ्यावर काही चादरी अंथरलेल्या दिसल्या ते बघून आम्ही थोडे पुढे आलो. तिथे एक कोरडा पडलेला, बऱ्यापैकी मोठा असलेला तलाव आहे.तो बघून आम्ही लगेच तलावाच्या डाव्या बाजूने उतरणीच्या मार्गाला लागलो. दहा ते पंधरा मिनिटात आम्ही साधारण एक वाजेच्या दरम्यान गड पायथ्याला आलो व तेथील नागेश्वर मंदिर,हनुमान मंदिर वैगरे बघून लगेचच गाडीला किक मारली व आता पुढील लक्ष्य होते ते म्हणजे खतरनाक असा औंढा
.....डुबेरगावातून आम्ही ठाणगाव मार्गे मजल दर मजल करत(रस्ता विचारत विचारत😀) तिरडे गावात येऊन पोहोचलो. तिथे स्थानिकांना *औंढा किल्ल्या* बद्दल विचारले तर ते म्हणाले की इथे औंढा नावाचा किल्लाच नाही😂आता झाली का पंचायत.ह्या भागात फक्त पाचपट्टा किल्ला आहे. औंढा नावाचा किल्लाच नाही!
मग त्यांना विचारले, ज्या किल्ल्यावर जाण्यासाठी साखळी बांधलेली आहे तो डोंगर कुठला?मग त्यांना कळाले की आम्हाला नेमके कुठे जायचे आहे ते. मग त्यांनी सांगितले की त्याचे नावं तर लिंगीचा डोंगर असे आहे😀
चला लिंगीचा डोंगर तर लिंगीचा! त्यांना रस्ता विचारून आम्ही लांबून दिसणाऱ्या विंडमिलच्या रोखाने एकदम ओबडधोबड अश्या कच्च्या रस्त्याने गाडी घातली.रस्ता कसला तो तर ढोरक्यांच्या शेळ्या-बकऱ्यांचा रोजचा डोंगरात चरण्यासाठी जाण्याचा रस्ता होता,आज तर आमच्या गाडीचा सुद्धा आमच्या सोबतच बऱ्यापैकी कस पडणार होता म्हणा की!😀
शेवटी सर्व अडथळे पार करून दुपारच्या २:१०च्या दरम्यान आम्ही औंढ्याच्या पायथ्याला असलेल्या विंडमिल जवळ येऊन पोहोचलो व तिथेच गाडी पार्क करून व पाठीवरील सॅकचा धुंडोळा घेऊन लगेच गडाकडे प्रयाण केले मागे चार-पाच वर्षांपूर्वी सुद्धा अंशुमनने व मी औंढा केला होता पण आता इकडे बरेच बदल झाले आहेत.त्यामुळे आम्हाला गडावर जाण्याचा मार्ग सापडला नाही.रस्ता शोधता शोधता आम्ही संपूर्ण गड पायथ्याला फेरी केली तरी पण रस्ता सापडतच नव्हता!शेवटचा प्रयत्न म्हणून परत एकदा पूर्वेच्या बाजूस चालत पुढे आल्यानंतर एके ठिकाणी एक पाऊलवाट थोडी वरच्या बाजूस गेलेली दिसली.त्या वाटेने थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला एकदाचा रस्ता सापडला.झिजलेल्या/तुटलेल्या अवस्थेतील दहा ते बारा पायऱ्या चढून वर आल्यानंतर सुरू झाला तो औंढयाचा खतरनाक चढाई मार्ग.🙏🏻
पहिल्या टप्प्यातील मार्गावर ठिकठि
काणी गज रोवलेले आहेत व त्याला जोडूनच एक साखळी व नायलॉनचा एक दोर व एक तार आहे त्याचा आधार घेऊन आम्ही पहिला टप्पा पार केला.आता दुसऱ्या टप्प्यात फक्त लोखंडी साखळी व ती सुद्धा वरपासून खालपर्यंत तिला कुठेच ठेवा नव्हता व ह्या टप्प्यातील पहिलाच पॅच खूप अवघड आहे. सरासरी चार ते पाच फुटाचा कातळाचा भाग हा पुढे आलेला आहे व तो चढणे तसे अवघडच आहे,मग आजूबाजूला बघितले तर त्याच्या डाव्या बाजूला अजून एक नायलॉनच्या वायर सदृश्य(केबल)? बांधलेली होती.तो पॅच आम्हाला चढाई करण्यास सोप्पा वाटला पण त्या केबलवर विश्वास वाटत नव्हता म्हणून आम्ही ती साखळी सुद्धा ह्या बाजूस घेतली व तिच्या साहाय्याने आधी अंशुमनने तो टप्पा लीलया पार केला व वरती गेल्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली तो टप्पा मी चढून वर आलो,पुढे थोडा पायऱ्यामार्ग व थोडा घसारा असलेला मार्ग पार करून गडमाथ्याकडे आलो.समोरच गड देवता व काही शेंदूर लावलेले दगड व त्याच्या खालच्या बाजूस तीन ते चार खंबाटके व गुहा दिसल्या ते बघून आम्ही थोडे वरती आलो. तिथे बाजूस कोरडे पडलेले दोन टाके व बुजलेले एक- दोन टाके बघून पश्चिम बाजूने पुढे गेलो. तिथे आम्हाला एक चोर दरवाजा व पायऱ्या नजरेस पडल्या.मी पायऱ्या उतरून खाली गेलो पण शेवटच्या पायरीच्या पुढे जाण्याची हिम्मत केली नाही.म्हणजे आज वाऱ्याचा जोर एवढा होता की मला पुढे जायलाच जमत नव्हते. वारा एक सारखा मागे फेकत होता!मग तिथूनच दरवाज्याच्या समोर असलेले दोन टाके बघून आम्ही गड माथ्यावर आलो.गड माथा तसा खूपच छोटा आहे.तिथे थोडे फोटो वैगरे घेऊन आम्ही लगेचच खाली उतरण्यास सुरवात केली व दहा ते बारा मिनिटात आम्ही परत थरारक अश्या कातळ टप्प्यावर पोहोचलो. पहिला टप्पा मी पार करून आलो नंतर अंशुमनने सुद्धा पहिला टप्पा पार केला व दुसऱ्या टप्प्याच्या तोंडावर येऊन पोहोचलो व तो टप्पा सुद्धा आम्ही पार करून पायथा गाठला.आता दुपारचे चार वाजत आले होते.लवकरच आम्ही गाडी जवळ आलो व तिथेच विंडमिलच्या खाली बसून जेवण केले व परतीच्या मार्गाला लागलो. आता परतीचा मार्ग म्हैसवळण घाट उतरून टाकेदमार्गे घोटी सिन्नर मार्गावरील धामणगाव व पुढे साकुर फाट्यावरून दारणा धरण मार्गे मुंबई-आग्रा महामार्ग जवळ केला व सातच्या आत घरात
🙏🏻
*SON OF SAHYADRI*
*जय जिजाऊ*
*जय शिवराय*
*जय महाराष्ट्र*
🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻
घुम्मकड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा