फिरस्त्या!

 सुख म्हणजे नेमके काय असते?


          नववर्षाच्या पहिल्या रविवारी पहाटे पहाटे कडाक्याच्या थंडीत दुचाकीला मारलेली किक व सेलबारी-डोलबारी रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच,राकट,धडकी भरवणारे ताशीव कडे,मराठ्यांनी आमने सामने लढाई करून मुघलांना आपल्या तलवारीचे पाणी जिथे पाजले अश्या ऐतिहासिक किल्ल्याकडे केलेली कूच🙏🏻

चि. अंशुमनने व मी बऱ्याच दिवसांपासून एका दिवसात व कमीतकमी वेळेत जबरदस्त व शारीरिक क्षमतेची कसोटी जोखणारा ट्रेक केला नव्हता,तसा डिसेंम्बर मध्ये खडतर असा AMK केला होता, पण कमीतकमी वेळेत शारीरिक क्षमतेची कसोटी जोखणारा ट्रेकचा योग जुळलाच नव्हता! म्हणजे तशी संधी म्हणा किंवा ताळमेळ बसत नव्हता.

चि.अंशुमन व मी गेल्या दोन वर्षांपासून(कोरोना काळ)आम्ही दोघांनीच आमचा एक ग्रुप बनवला आहे व त्याचे नामकरण सुद्धा केले SON_OF_SAHYADRI व जमेल तसे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत फिरण्याचा छंद जोपासला आहे🙏🏻

मग ह्या अश्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या ट्रेकची अनावर इच्छा आम्ही साल्हेर-सालोटाची एका दमात भटकंती करून पूर्ण करू असा विचार केला!

रविवारी पहाटे निघून आम्ही सकाळी ९.१५ दरम्यान सरासरी १४२किमीची राईड करून  साल्हेरवाडी मध्ये पोहोचलो,तिथेच बाजूच्या हॉटेल मध्ये थोडा नास्ता करून व गाडी पार्क केली व परत एकदा पाठीवरील सॅकची उजळणी केली व  ९.५०च्या दरम्यान साल्हेर चढाईस सुरवात केली,या आधी सुद्धा दोन वेळेस साल्हेर भटकंती केली होती पण नेहमी प्रमाणे सालोटा राहूनच जायचा,पण आज कुठल्याही परिस्थितीत साल्हेर व सालोटा भ्रमंती करायचीच हे ठरवलेलेच होते,त्या नुसार चढाईचा वेग व वेळेचे नियोजन करावे लागणार होते त्यानुसार साल्हेर चढाई नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून न करता सरळसरळ उभ्या डोंगर धारेवरील गायवाटेवरून चढाईस सुरवात केली व काही वेळेतच पहिल्या दरवाजा समोर आलो,सध्या गडावर बऱ्यापैकी संवर्धनच्या कामाने वेग घेतलेला आहे, बरेच कामगार तिथे काम करत होते,तिथून पुढील सर्व मार्ग माहितीचा असल्यामुळे झटपट पावले उचलत आम्ही सर्व दरवाजे पार करून गंगा सागर तलावावर येऊन पोहोचलो, तेथिल गणपती/रेणुकामाता मंदिर व टाके,गुहा,अवशेष पाहून गडावरील सर्वोच ठिकाणी जाण्यासाठी गुहेच्या उजव्या बाजूने न जाता सरळ आम्ही पुढे गेलो जिथे एक दरवाजा लागतो त्याच्या अलीकडे थोडे थांबून एक छोटा ब्रेक घेतला, एक-एक सफरचंद व थोडे बोरं खाल्ले सोबतच थोडे पाणी पिऊन आम्ही गडमाथ्यावरील परशुराम मंदिरा कडे जाण्यासाठी निघालो तर त्या निसरड्या वाटेवर एक ग्रुप एकमेकाला मदत करत खाली उतरत होता त्यातील एकाने आवाज दिला ओ सर इकडे कुठे? आवाजाच्या दिशेने बघितले तर ते माझे मित्र डॉ.दळवी सर व डॉ.बोराडे सर व त्यांची टीम भेटली त्यांच्या सोबत थोडे बोलून व फोटो काढून लगेच गडमाथ्या कडे चढाई सुरू केली गडमाथ्यावरून सह्याद्रीचे अफाट रूप डोळयात साठवून आम्ही लगेच त्या निसरड्या वाटेवरून परत फिरलो, आता बऱ्यापैकी निसरड्या वाटेवरची चढाई व उतराईची सवय झाल्यामुळे आम्ही उतरत असलेल्या त्या ग्रुपच्या आधी ती वाट उतरून समोरील दरवाजा पार करून आम्ही सालोट्या कडे जाणाऱ्या वाटेला लागलो,वाटेत खोदलेले भरपूर टाके व गुहांची रांग लागते,ते सर्व पाहत काही फोटो घेत आम्ही सरते शेवटी शेवटचा दरवाजा व पुढील कातळात खोदलेल्या पायऱ्या पार करून साल्हेर व सालोट्याच्या खिंडीच्या जवळ(वाघांबे खिंड) पोहोचलो समोरच सालोटा दिसत असून सुद्धा तिकडे जाण्यासाठी सरळ वाट नसून तिथून उजव्या हाताने बरेचसे पुढे जाऊन त्या वाटेने खालच्या बाजूने चालत चालत आपण खिंडीत पोहोचतो,तिथून एक वाट वाघांबे गावाकडील मार्गाकडे जाते व दुसरी उजवीकडील वाट ही सालोट्याच्या चढाई मार्गाकडे जाते,आता बऱ्यापैकी उन्हाचा कडाका जाणवत होता,घड्याळाकडे बघितले तर दुपारचे १.०५वाजत आले होते,आता मात्र इथून पुढे झटपट पावले उचलत सालोटा माथा गाठणे हा उद्देश समोर ठेवून अंशुमन व मी सालोट्याच्या वाटेवरून वाटचाल करत लवकरच कातळात खोदलेल्या अप्रतिम अश्या पायऱ्यांच्या जवळ आलो,आता मात्र छातीचा भाता एकदम जोरजोरात चालत होता,क्षणभर थांबून थोडे पाणी पिऊन लगेचच त्या पायऱ्या चढाईला सुरवात केली व लवकरच एका ढासळलेल्या दरवाज्या जवळ येऊन पोहोचलो,कड्यावरून दगड कोसळल्या मुळे तो दरवाजा पार करण्यासाठी आपल्याला दारवाज्यातील दगडावरून जावे लागते,थोडे पुढे गेल्यावर बऱ्यापैकी सरळ रेषेतील चाल असल्यामुळे दमणूक जास्त होत नाही,पुढे आम्हाला तीन ते चार जणांचा एक ग्रुप भेटला त्यांच्याशी थोडे बोलून आम्ही सरळ पुढे आलो व दुसऱ्या दरवाज्यात आल्यावर तिथून दिसणारा आजूबाजूचा परिसर व एकदम मोहक असे साल्हेरचे रुपडे डोळ्यात व कॅमेऱ्यात साठवून आम्ही सरळ पुढची वाट धरली वाटेत  बरेच खोदीव टाके व गुहा लागतात,जश्या साल्हेर वरील सालोट्याच्या मार्गावर गुहा व खांबाटके आहेत तसेच इथे सालोट्यावर सुद्धा टाके व गुहांचे बांधकाम आढळते,

ते सर्व पाहून आम्ही पुढे तिसऱ्या व त्याला जोडूनच असलेल्या चौथ्या दरवाज्या पर्यंत गेलो व ते पार करून आम्ही गड पठारावर आलो गडपठारावर दोन टाके व काही भग्न अवशेष नजरेत पडतात ते सर्व बघून व गडपठाराची भ्रमंती करून आम्ही समोरच असलेल्या सालोट्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाण्यास निघालो,इथे सुद्धा खूपच निसरड्या वाटेने आमचे स्वागत केले😀पण ती वाट आम्ही लीलया पार केली व गडमाथ्यावर पोहोचलो तिथून  साल्हेरची दुसरी बाजू व आजूबाजूचा परिसर मुल्हेर,मोरा,हरगड,मांगी-तुंगी,रतनगड(न्हावीगड)कंडाळा, टकारा सुळका, व इतर डोंगर व संपूर्ण डोंगररांग नजरेत साठवून लगेचच परतीच्या मार्गाला सुरवात केली आता घड्याळात दुपारचे २.३० वाजत आले होते.

सालोट्याच्या माथ्यावरून आम्हाला साल्हेरवर भेटलेले आमचे डॉ.मित्र व त्यांचा ग्रुप खिंड(वाघांबेखिंड) मार्गे साल्हेरवाडी कडे उतरत असतांना दिसला, आम्ही मनोमन ठरवले की उतराईचा मार्ग एकादमात उतरून त्या ग्रुपला लवकरात लवकर गाठूयात,😍

अंशुमनने व मी थोडे पाणी पिऊन लगेचच परतीच्या मार्गाला झपाझप पावले उचलत सुरवात केली व काही वेळेतच आम्ही खिंड गाठली व खिंड उतरून आम्ही साल्हेरवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर लागलो व झपाझप पावले उचलत आम्ही साल्हेरवाडीच्या अलीकडच्या गावात पोहचण्या आधी त्या ग्रुपला गाठले व त्यांच्या सोबत चालत गावांत पोहोचलो,त्यांची गाडी त्यांना घ्यायला आली होती त्या गाडीत बसून आम्ही साल्हेरवाडीत पोहोचलो आता दुपारचे ३.२० झाले होते,

सरासरी ५.३०तासात आम्ही साल्हेर व सालोटाची भारदस्त व तेवढीच दमणूक करणारी भ्रमंती करून शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा ट्रेक करून २०२२च्या सुरवातीलाच क्षमता जोखून बघितली 😍 

साल्हेरवाडीत आमचे मित्र डॉ.नेमाडे सर व सुरजितसिंगपाजी व त्यांचा ग्रुप मधील सहकारी भेटले ते कालच साल्हेर मुक्कामी होते व आज सकाळी त्यानी सालोटा करून पलीकडे वाघांबेगावांत उतरून ते साल्हेरवाडी मध्ये आले होते त्यांच्याशी थोडी बातचीत करून व थोडा नास्ता करून आम्ही लगेचच गाडीला किक मारून परतीच्या प्रवासाला सुरवात केली,

कारण अंधार पडण्याआधी आम्हाला मुंबई-आग्रा महामार्ग जवळ करायचा होता त्यानुसार आम्ही लगेचच साल्हेरवाडीतुन निघालो,व सटाणा मार्गे भावडबारी पार करून आग्रा महामार्गे घरी पोहोचलो

घरी पोहचल्यावर गाडीचे स्पिडोमीटरवर एकूण रिडींग होती २८९किमी! 

म्हणजे एका दिवसात २८९किमीची बाईक राईड(तसे पाहता एवढी बाईक राईड ही अंगवळणी पडली आहे कारण बाईक राईडची आवड पहिल्या पासूनच आहे🙏🏻) व महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला किल्ला व त्याचा जोड किल्ला करून सातच्या आत घरात🙏🏻


🚩🙏🏻🚩


जय हिंद!

जय महाराष्ट्र!!

जय शिवराय!!!


SON_OF_SAHYADRI

🚩🙏🏻🚩

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आड किल्ला,डुबेरकिल्ला व औंढाकिल्ला