SON OF SAHYADRI
बऱ्याच दिवसांपासून मिस होत असलेल्या ट्रेकची आज शेवटी भट्टी जमुनच आली🙏🏻
सातमाळेच्या उपरांगेतील मनमाड रेंज मधील असलेले काहीसे अपरिचित व अडवळणी असलेले किल्ले म्हणजे कात्रा व मेसणा
मागे जुलै मध्ये त्याच रांगेतील गोरखगड,अंकाई-टंकाई एका दिवसात भरपूर तंगडतोड करून केले होते,त्याच वेळेस ठरवले की कात्रा व मेसणाची भटकंती सुद्धा अशीच एका दिवसात करून टाकू!
पण जुलै(२०२१)पासून तसा तिकडे भटकंती करण्याचा योग काही जुळून येतच नव्हता,शेवटी आज १६जानेवारी२०२२ला कात्रा व मेसणाची भटकंतीचा ताळमेळ बसलाच 😍
सकाळी ६वाजेच्या दरम्यान मी व अंशुमनने सर्व आवरसावर करून कडाक्याच्या थंडीत मुंबई-आग्रा रोड मार्गे चांदवड गाठले.
चांदवड-मनमाड रोडने चांदवडच्या पुढे दुगांव पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो त्या मार्गे गंगावे,निंबाळे,रायपूर,वडगांव पंगू वरून कात्रा किल्ल्याचे पायथ्याला असलेले गांव कातरवाडी सकाळी ८.३०च्या दरम्यान गाठले🙏🏻
(कारण आधी आम्ही कात्रा किल्ल्याची भटकंती करून नन्तर मेसणा किल्ल्याची भटकंती करू असे ठरवले होते)
योगायोगाने किल्ल्याच्या पायथ्याला जिथे गाडी लावली ते नातेवाईकच निघाले,त्यांच्याशी गप्पा मारता मारता गडावर जाण्याचा रस्ता विचारून घेतला व सोबतच पाठीवरील सॅक काढून त्यातील वस्तूंची परत एकदा काळजीपूर्वक उजळणी केली, व त्यांचा निरोप घेऊन ९ वाजेच्या सुमारास मी व अंशुमनने गड चढाईस सुरवात केली,थोडेसे चालल्यावर समोरच कपिलमुनींचा आश्रम लागतो.आश्रमाच्या परिसरात साफसफाई बऱ्यापैकी दिसून आली व परिसरात भरपूर झाडे लावलेली आहे,
आश्रमाच्या डाव्या बाजूच्या एका गाय वाटेवरून आम्ही किल्ल्याच्या दिशेने चढाईस सुरवात केली,कारण इकडे डोंगरभटक्यांचे पाय क्वचितच वळतात म्हणून रुळलेली अशी वाट नाही,ज्या पण वाटा आहेत त्या सर्व गायवाटा आहेत,किल्ला नजरे समोर ठेवून मी व अंशुमनने कपिल मुनींच्या आश्रमा मागील डोंगराच्या पोटापोटाने किल्ल्याकडे मार्गक्रमण केले बऱ्याच ठिकाणी काही वाटा मधेच गवतात गायब होत होत्या😀पण लगेचच दुसरी एखादी पायवाट दिसली की तिच्यावरून आम्ही पुढे चालत राहिलो,बऱ्याच ठिकाणी घसारा खूप आहे व सगळीकडे गवत खूप वाढलेले आहे व सोबतच गुलतुऱ्याचे जंगल भरपूर आहे,बराच वेळ चालल्यावर आम्ही एका घळी जवळ येऊन पोहोचलो तिथे थोडे पाणी पिऊन व आजूबाजूचा आढावा घेऊन नेमके कुठल्या बाजूने वर चढाई करायची याचा अंदाज घेतला व लगेचच घळीतून पुढे वरच्या बाजूस चालायला सुरुवात केली, घळ थोडी चढून आल्यावर घळेच्या उजव्या बाजूस झाडोऱ्यात लपलेल्या गुहांचा समूह नजरेस पडला, गुहेत थोडे थांबून व आजूबाजूचा नजारा पाहून लगेच आम्ही घळ चढून वर आलो व किल्ल्याच्या माथ्याच्या रोखाने पुढे चालत आलो पहिल्या टप्प्याच्या पठारावर दोन ते तीन अर्धवट बुजलेले टाके आहेत अजून थोडे पुढे आल्यावर खालच्या बाजूस ३ते४ गुहांचा एकत्रित समूह आढळतो व आपणास येथे एका गुहेतून दुसऱ्या गुहेत सहजपणे जाता येते.व गुहे समोरच खाली एक खोदीव टाके आहे,
तिथून आम्ही पुढे उजव्या बाजूने बरेच पुढे गेलो व गडमाथ्यावर जाण्यासाठी मागील बाजूने चढाई केली तिकडे भरपूर घसारा आहे, शक्यतो नवख्यानी ह्या बाजूने बाजूने चढाई करायचे टाळलेले बरे,
गडमाथ्यावर एका भल्यामोठ्या दगडाला शेंदूर फासलेला आहे व हौदा सारखे काहीतरी वीट बांधकाम केलेले आहे ते बघून आम्ही समोरील टोकाकडे आलो तिथून आम्हाला पूर्वेकडे डाव्या बाजूस हडबीची शेंडी,व समोर कपिल मुनींचा आश्रम असलेला डोंगर व त्यामागे अजून एकदोन डोंगर दिसत होते,तर उजव्या बाजूस गोरखगड व त्याच्या मागच्या बाजूस अंकाई व टंणकाई हे जोडकिल्ले दिसत होते,तर मागील बाजूस चांदवड रांग धूसर दिसत होती कारण आज वातावरण थोडे ढगाळ होते, तिथेच किल्ल्याच्या पठारावर बसून गूळ,शेंगदाणे व खाऱ्या फुटण्यावर ताव मारला व लगेचच खाली उतरण्यास सुरवात केली पण परत मागे न जाता सरळ समोरच्या बाजूने उतरण्यास सुरवात केली,सुरवातीलाच एक १४ते१५ फुटांचा अवघड असा कातळ टप्पा लागला, आता तर पंचाईतच झाली परत मागे फिरून खाली यायचे तर किमान एक तास लागणार होता.शेवटी थोडी हिम्मत करून तो कातळटप्पा सर्व काळजी घेऊन रॅपल केला! व सरते शेवटी घळेच्या तोंडावर आलो व झटपट घळ उतरून पायथ्याच्या दिशेला निघालो,
पायथ्याला आल्यावर परत एकदा पाठीवरील सॅकची उजळणी केली व गाडी जिथे लावली होती त्यांना रामराम ठोकून मेसणा किल्ल्याकडे जाण्यासाठी गाडीला किक मारली!
आता मेसणखेडी कडे जाण्यासाठी पुढे वडगांव पंगू मध्ये एका टपरीवजा दुकानावर थांबून सविस्तर मार्ग विचारून घेतला व तिथून पुढे रेपलेगांवावरून वाघदर्डी गांव मार्गे वाघदर्डी धरणाच्या भिंती समोरून दत्ताचे शिंगवे गावाचा रस्ता धरला व सरळ शिंगवे गावातून पुढे मेसणखेडी गावांत पोहोचलो,गावाच्या थोडे पुढे आलो(जेजुरे वस्ती) व तिथेच रस्त्याच्या कडेला शेळ्या-बकऱ्या वळणाऱ्याला विचारले की मेसण्याच्या डोंगरावर जाण्यासाठी कुठल्या बाजूने जावे?
तर तो म्हंटला तुम्ही बरेच पुढे आला आहात!
मागे फिरून जा, गावाच्या बाजूने रस्ता आहे तिकडून जा!
त्याला म्हंटलो अरे हा काय समोरच दिसतोय रे मेसण्याच्या डोंगर,तर तो म्हंटला तुमची तयारी असेल तर इकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण चढाई सरळ अंगावर येणारी आहे,पहा जमत असेल तर?😍
आता दुपारचा एक वाजत आला होता,
मग काय आम्ही तिथेच एका कोरड्या पडलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या काठावर गाडी लावली व दोन ते तीन कांद्याचे शेत पार करून डोंगर पायथ्याला येऊन पोहोचलो. व सरळ गायवाटेवरून चढाई सुरू केली,जवळजवळ २५ते३०मिनिटांची चढाई केल्यावर आम्ही एका पठारवजा जागेवर पोहोचलो,तिथून आजूबाजूचा परिसर न्याहळत परत चढाईला सुरवात केली.
१५ते२०मिनिटांच्या चालींनतर आम्ही एका सरळ उभ्या डोंगर कड्याच्या खाली पोहोचलो तिथे थोडे आजूबाजूला पाहून वरती जाण्याचा रस्ता शोधला व एके ठिकाणी थोडी पाऊलवाट दिसली त्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आम्हाला कड्याच्या वरती जाण्यासाठी एका कपारीवजा भागातून वरती जाण्याचा रस्ता सापडला,कपारीच्या बाजूला एक भुयारा सारखे गोल खड्डे पडलेले आहे तिथे स्थानिकांनी भगवा झेंडा लावलेला आहे,व काही दगडांना शेंदूर फासलेला आहे ते बघून आम्ही पुढे गेलो व वरती चढाई करून विस्तीर्ण अश्या पठारावर आलो,
आता पठारावरून डाव्याबाजूस गडमाथा खुणावत होता,आम्ही लगेच गडमाथ्याच्या दिशेने चालण्यास सुरवात केली.
गडमाथ्यावर अलीकडेच कुणीतरी पिराचा हिरवा झेंडा व दगड रचून थडग्यासारखी रचना करून वरती हिरव्या कपड्याची चादर अंथरून ठेवलेली दिसली,त्याच्या पुढे डाव्या बाजूस डोंगर कड्यावर परत एक भगवा झेंडा लावलेला दिसला.गडमाथ्यावरून आपल्याला कात्रा, हडबीची शेंडी,गोरखगड, अंकाई-टणकाई किल्ला व चांदवड रेंज मधील काही किल्ल्यांचे दर्शन होते.गडमाथा तसा एकदम आटोपशीर आहे,
आम्ही गडमाथ्यावरून चोहोबाजूला कुठे काही अवशेष आहेत का गडमाथ्याच्या डाव्या बाजूस काही घरांचे अवशेष व काही टाके नजरेस पडले आम्ही गडमाथा उतरून त्या आवशेषांकडे गेलो तिथे एकत्र तीन टाके व त्याच्या थोडे पुढे परत दोन टाके आहेत दोन ते तीन टाक्यांमध्ये पाणी आहे व बाकीचे अर्धवट बुजलेले आहेत.तिथून सरळ पुढे आल्यावर एक कोरडे पडलेले छोटेसे तळे दिसले.तळ्याच्या बाजूने सरळ पुढे येऊन आम्ही उतरणीच्या रस्त्याला लागलो,कुठेही न थांबता आम्ही ३०ते३५ मिनिटात गडपायथा जवळ केला आता दुपारचे २.४५ वाजत आले होते, तिथेच खाली कोरड्या पडलेल्या बंधाऱ्यात एका झाडाखाली बसून आम्ही जेवण केले व सरासरी ३वाजेच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरवात केली🙏🏻
इति कात्रा व मेसणा भ्रमंतीय नमः🙏🏻😍🙏🏻
SON OF SAHYADRI
जय जिजाऊ!
जय शिवराय!!
जय महाराष्ट्र!!!
मस्त....
उत्तर द्याहटवा🥰
हटवा